वालचंदनगर प्रतिनिधी:=
फळ विक्रेत्याचा मुलगा झाला सीए: जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
कळंब (रामवाडी) वालचंदनगर येथील फळविक्रेते आयुब जंगबहादुर आळंद यांचा मुलगा अबरार आयुब आळंद याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेला गवसणी घालत यश संपादन केले. अबरारच्या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फिटले आहे.
अबरारने प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवघ्या २३ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली.
अबरार आळंद यांचे शिक्षण भारत चिल्ड्रन अकॅडमी वालचंद नगर येथून तसेच अकरावी बारावी वाणिज्य शाखेतील शिक्षण बीएमसीसी पुणे आणि बीकॉम एमएमसीसी कॉलेज पुणे येथून झाले. अबरारने अभ्यासात विशेष लक्ष केंद्रित करून दररोज दहा ते बारा तास अभ्यास करून अवघ्या २३ व्या वर्षी यश संपादन केले.
त्याने सुरुवातीपासूनच सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने मेहनतीने वाटचाल केली. त्याच्या यशामध्ये आई-वडील भाऊ-बहीण मार्गदर्शक शिक्षक आणि सहकारी मित्र यांचा मोलाचा वाटा आहे. त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये फाउंडेशन परीक्षा पास केली. मे २०२२ मध्ये इंटर परीक्षा उत्तीर्ण केली. सन २०२५ मध्ये सी ए फायनल चा पहिला ग्रुप पास होऊन जानेवारी २०२६ मध्ये दुसरा ग्रुप पास होऊन अखेर स्वप्न सत्यात उतरवले.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन हे यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आय सी ए आय) पुणे शाखेच्या वतीने सीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. त्यासाठी संगणक, संभाषण कौशल्य, स्किल डेव्हलपमेंट असे कोर्स राबविले जातात. तसेच तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते त्याचा फायदा झाल्याचे अबरारने सांगितले.
वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्याकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा आता सीएच्या आव्हानात्मक करियर कडे वाढताना दिसत असल्याचे अबरार आळंद यांनी सांगितले. देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल दिनांक १ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला.
आणि त्यामध्ये अबरार आळंद यांनी मिळवलेल्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व अबरार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अबरार आळंद यांचे वडील वालचंदनगर परिसरामध्ये आठवडे बाजारात फळ विक्रेत्याचा छोटासा व्यवसाय करतात आणि आई गृहिणी आहेत.
आळंद कुटुंबाची यशाची परंपरा कायम:
अबरार आळंद यांचे चुलत बंधू वसीम आळंद हे सीए असून दुसरे चुलत बंधू आजम आळंद हे पीएसआय आहेत.
आळंद कुटुंबाची स्पर्धा परीक्षांतील यशाची परंपरा अबरार यांनी कायम ठेवली आहे.
फोटो ओळी:= अबरार आळंद


